04 June 2012

'ये हृदयीचे ते हृदयी..'


    मनाच्या प्रत्येक जाणिवेसरशी असंख्य विचारांचं  एक वादळ उठत असत. सुरुवातीला कोणे एके काळी, 'ही वादळ का उठतात?' असा प्रश्न पडायचा. अनेकदा असंही वाटून जायचं कि हे विचार करणं, प्रत्येक गोष्टीचा आगा-पिछा पडताळून पाहणं हे सगळे त्रास कशासाठी? कारण अनेक प्रश्न अखेर अनुत्तरीतच राहतात. मग शांतपणे बसून 'मी भला आणि जे घडतंय ते हि भलं' ह्या न्यायाने का जगू नये? पण काही देणग्या अश्या असतात कि त्यांची महती जरा उशिरानेच कळते. सुरुवातीला जाच वाटणाऱ्या गोष्टींचं मोल हळू हळू उमजायला लागतं  आणि मग हे 'त्रास' नाहिसे होतात. 'मीच का?' 'मला ह्या चिंता लागतातच कशाला?' असे प्रश्न हळू हळू विरत  जाऊन  त्यांची जागा 'हे घडणार नसेल  तर मी आहे तरी काय?' यासरखे अधिक महत्वाचे प्रश्न घेतात आणि त्यांची उत्तरं शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यातून येणारी जबाबदारी ओळखणं जास्त महत्वाचं आहे याचं भान येतं.


       'आपण 'विचारवंत' झालोय किंवा आपल्याला अचानक काहीतरी दिव्य दृष्टी मिळाली आहे आणि ती जगाला देऊन जगाला काही संदेश द्यायचा आहे....' असा अहंगंड माझ्या मनाला अजून शिवलेला नाही आणि तो शिवू नये अशीच प्रार्थना आहे. मला जे काही बरं - वाईट सुचतं, मनाला जेव्हा काहीतरी रुचतं किंवा खोलवर काहीतरी टोचतं ते चार चौघांना बोलून दाखवावसं वाटतं, त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यावस वाटतं, 'ये  हृदयीचे ते हृदयी' हा प्रवास घडावासा वाटतो म्हणून हा लेखनप्रपंच..

तुमचा 
--सिद्धनाथ गानू

2 comments:

  1. ye hrudiyeche te hrudayi ani tyahi peksha ye hrudyachi te manasi honyasathi apanas shubhechcha!

    ReplyDelete
  2. प्रिय सिद्धनाथ, छान! तुझ्या ब्लोग मधून तु खूप चांगले लेखन करावेस हि सदिच्छा

    ReplyDelete